मुंबई, दि. २७ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले. ‘समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मुल्यांचा पुरस्कार करणाऱ्या संत रविदास यांचा मानव धर्मच श्रेष्ठ आहे, हा संदेश मोलाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत रविदास महाराज परखड विचारांचे होते. त्यांच्या दोह्यांना अनेक भाषांमध्ये, विविध धर्म आणि प्रांतांमध्ये स्थान मिळाले, अशी त्यांची उच्च प्रतिभा होती. परकीयांच्या आक्रमणाला परतवण्यासाठी सर्व भेद विसरून एकजूट व्हा असे सांगतानाच, संत रविदास यांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मुल्यांचा पुरस्कार केला. मानवतावाद आणि सामाजिक सलोखा हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. मानव धर्मच श्रेष्ठ आहे, असा मोलाचा संदेश देणाऱ्या संत रविदास महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.