मुंबई, दि. २७- कोविड – १९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी आज खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.