धरणगाव | विनोद रोकडे
आस्मानी संकटामुळे खान्देशातील बळीराजा संकटात सापडला आहे. अशात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खान्देशात त्वरीत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी जळगाव लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे .
दूर दृष्य प्रणाली द्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधला. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा पक्षप्रमुखांनी या बैठकीत घेतला.दसरा मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांसोबत पक्षप्रमुखांची भेट ठरलेली असते. यंदा कोरोना संकटामुळे ही भेट झाली नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी दूरदृष्य प्रणाली द्वारे संपर्क साधून भेटीची परंपरा कायम ठेवली आहे . राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख या बैठकीत जोडले गेले होते. या बैठकीत जळगावचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील सहभाग नोंदविला.
कापूस खरेदी केंद्र सुरू करा : शिवसेनेचे जळगाव लोकसभा जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ .
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यासह खान्देशातील कापसासह ज्वारी, मका, कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच लाकडाऊनमुळे शेतकरी
आर्थिक विवंचनेत सापडला असतांना ऐन दिवाळीत त्याचे दिवाळे निघाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा मजबूरीचा लाभ खाजगी व्यापारी उठविण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावीत यासह ज्वारी, मका, कडधान्यांची शासकीय खरेदी सुरू करून शेतकन्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
कोरोना नियंत्रणात शासनाचे योग्य मार्गदर्शन, आपणाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य, सर्व शासकीय यंत्रणेच्या अविरत प्रयत्नानंतर जिल्ह्यातील कोराना संकट नियंत्रणात आले आहे . धोका टळला नसला तरी त्याची तिव्रता मात्र कमी करण्यात यश आले आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्वदीच्याही पुढे गेले असल्याचे गुलाबराव वाघ यांनी या बैठकीत सांगितले.जिल्ह्यातील सर्वच प्रमुख घटना, घडामोडीसह शेतकरी, परतीच्या पावसाचा तडाखा,पक्षप्रमुख श्री.ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद आदी विषयांची माहिती गुलाबराव वाघ यांनी दिली.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचे केले अभिनंदन
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चौफेर केलेल्या टोलेबाजीचे राजकीय पडसाद जिल्ह्यातही उमटले असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आपल्या ‘मार्मिक’ फटकेबाजीमुळे विरोधकांचे आवसान गळून पडले असल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांचे अभिनंदनही गुलाबराव वाघ यांनी बैठकीदरम्यान केले. दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता सुरू झालेली बैठक तब्बल दोन तास सुरू होती हे विशेष.