शिर्डी, प्रतिनिधी संजय महाजन | अहमदनगर ..
अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शिवसैनिक सत्तेच्या विरोधात लढा देत आला आहे. त्याला मूळ प्रवाहात घेऊन आता जिल्हानिहाय विविध शासकीय समितींवर काम करण्याची संधी द्यावी, अशी आग्रहाची मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे शिवसेनेचे मुकुंद सिनगर यांनी नुकतीच भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देताना सिनगर यांच्यासह सुनिल गिते,अशोक पवार,जयराम कदम शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
सिनगर यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडून कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील जनतेप्रती अनेक विकासकामांना प्राधान्य दिले जातेय,आपल्या नेतृत्वाबद्दल सामान्य शिवसैनिकांकडून मोठा आदर,आनंद व्यक्त होतोय.त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने नुकतीच जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आ.नरेंद्र दराडेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेळ मागितला आहे.
शिवसेनेच्या “विकेल ते पिकेल” या धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या आदरणीय भुसे साहेबांच्या कर्तृत्व आणि नेतृत्व यामुळे शेतकरी वर्गात अत्यंत समाधानकारक वातावरण असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून आम्हाला याचा सर्वाधिक अभिमान आहे. त्यामुळे आता सत्तेचा कणा असणाऱ्या जिल्ह्यातील शिवसैनिकांना मूळ प्रवाहात सामावून घेत आपापल्या योग्यतेप्रमाणे शासकीय समितींवर काम करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी सिनगर यांनी केलेली आहे. तसेच,श्री साईबाबा संस्थान,शिर्डी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी निवड हे महत्वाचे विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.