दिल्ली , वृत्तसंस्था
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते दोन आदिवासी कल्याण उत्कृष्टता केंद्रांचा प्रारंभ करण्यात आला . आर्ट ऑफ लिव्हिंगबरोबर भागीदारीमध्ये या उत्कृष्टता केंद्रांचे काम सुरू होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरूदेव श्री श्री रविशंकर उपस्थित होते .
झारखंडमध्ये ग्रामीण भागांमध्ये पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये आदिवासी कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. यासाठी प्रारंभी झारखंडमधील पाच जिल्ह्यातल्या 150 गावातल्या 30 ग्रामपंचायत प्रतिनिधींना आदिवासींसाठी असलेले कायदे, त्यांच्यासाठी असलेले उपक्रम यांच्याविषयी माहिती देण्यात येत आहे. या योजनेमध्ये आदिवासी युवकांना व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे आणि त्यांच्यामधूनच आदिवासी समाजासाठी कार्य करू शकणारे नेते तसेच स्वयंसेवक तयार करण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात आले आहे.
दुसरे उत्कृष्टता केंद्र महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. येथे 10,000 आदिवासी शेतकरी बांधवांना गो-आधारित शेती तंत्रज्ञानानुसार शाश्वत नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने शेती करीत असलेल्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय कृषी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर आदिवासी शेतक-यांना विपणनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.