मुंबई, 28 जानेवारी
राममंदिरासाठी मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक धर्मियही निधी संकलनात सहभागी होत असल्याने धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ घालून दिला जात आहे, असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख यांनी केले.
सायन येथे गुरुवारी झालेल्या राममंदिर निधी संकलन कार्यक्रमात अनेक मुस्लीम धर्मियांनी योगदान दिले. श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र विकास कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेते रझा मुराद ,श्रीराम मंदिर जनसंपर्क अभियान समितीचे सदस्य गिरीश शाह, संजय नगरकर , तसेच अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एजाज देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे की, देशात अनेक ठिकाणी मुस्लीम व अन्य अल्पसंख्याक बांधव राममंदिरासाठी निधी देण्यासाठी स्वेच्छेने पुढे येत आहेत.
सायन येथे झालेल्या कार्यक्रमातही मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा कार्यक्रमातून धार्मिक सलोखा आणखी मजबूत होईल, असेही श्री. देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे.