जयंतीनिमित्त संत शिरोमणी रोहिदास महाराजांना केले वंदन
मुंबई, दि. २७ :- संत शिरोमणी रोहिदास महाराज हे सर्वधर्मसमभाव, मानव कल्याणाचा संदेश देणारे राष्ट्रसंत होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीव्यवस्थेसारख्या अनिष्ठ रुढी-परंपरांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. दुर्बलांवर अन्याय, समाजाची लूट करणाऱ्या कर्मकांडांना प्रखर विरोध केला. त्यांनी लिहिलेल्या गीते व भजनांनी समाजप्रबोधनाचं क्रांतिकारी काम केले. शीख बांधवांच्या पवित्र ‘गुरु ग्रंथसाहेब’मध्ये संत रोहिदासांनी लिहिलेल्या चाळीस पदांचा झालेला समावेश, हे त्यांचे मोठेपण सिद्ध करणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत रोहिदासांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना वंदन केले.
संत रोहिदास महाराजांचा सर्वधर्मसमभाव आणि मानवकल्याणाचा विचार आचरणात आणूया, कायम स्मरणात ठेवूया, पुढे घेऊन जाऊया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.