शिर्डी, दि.२० | ब्यूरो रिपोर्ट…
कोव्हीड – १९ चे पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले निर्देशानुसार सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करुन साईभक्तांना दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे दर्शन सुवीधा उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.त्यानुसार सुरुवातीचे काळात दिवसभरात एकूण ६ हजार साईभक्तांना समाधी मंदिरामध्ये प्रवेश देणेत येत होता. सद्यस्थितीत गुरुवार, शनिवार, रविवार, शासकीय सुट्टी अथवा महत्वाचे धार्मिक दिवस इत्यादी दिवशी शिर्डीत येणा-या साईभक्तांच्या संख्येत वाढ होत आहे. या दिवाशी साधारणपणे १५ हजार पेक्षाही जास्त साईभक्त दर्शनासाठी शिर्डी येथे येत आहे.
उक्त पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार करता, शासनाने कोव्हीड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गर्दीचे काळात जास्तीत जास्त १२ हजार साईभक्तांना दर्शनास प्रवेश देणे मंदिर प्रशासनास शक्य होणार आहे.
साईभक्तांच्या गर्दीचा ओघ असाच कायम राहिल्यास सलग सुट्टीचे काळात आलेल्या सर्व साईभक्तांना श्री साईबाबांचे दर्शन उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. पर्यायाने कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय क्षमतेपेक्षा जास्त भक्तगण शिर्डीस आल्यास मोफत दर्शनपास वितरण काऊंटर तसेच दर्शन रांगेत गर्दी वाढून अभुतपूर्व परिस्थिती उभ्दवू शकते. याचा कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर साकल्याने विचार करुन साईभक्तांची संभाव्य गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने सर्व साईभक्तांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून खालील उपाययोजना करणे आवश्यक आहेत.
· श्री साईबाबांचे दर्शनाकरीता शिर्डी येथे येणा-या सर्व साईभक्तांनी संस्थानचे online.sai.org.in या वेबसाईटव्दारे दर्शनपास आरक्षीत करुन निर्धारित दिनांकास वेळेतच दर्शनरांगेत प्रवेश करणे आवश्यक आहे.
· online.sai.org.in या वेबसाईटव्दारे सशुल्क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील ०५ दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील ०२ दिवसांसाठी उपलब्ध असेल. (यात दर्शनाचा दिवस अंतर्भूत नाही.)
· online.sai.org.in या वेबसाईटव्दारे दर्शनपास आरक्षण करतेवेळी साईभक्तास स्वतःचा फोटो/ओळखपत्र संगणक (online) प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. दर्शनासाठी येतांना साईभक्तांना सोबत फोटो ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. (फोटो / ओळखपत्र अहस्तांतरणीय)
· दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांना फोटो / ओळखपत्र पडताळणीअंती दर्शनपास वरील नमुद वेळेतच दर्शनासाठी प्रवेश देणेत येईल. यात कोणतीही तडजोड करता येणार नाही.
· सलग सुट्टीचे कालावधीत (उदा.गुरुवार, शनिवार, रविवार, शासकीय सुटी अथवा महत्वाचे धार्मिक दिवस इत्यादी) श्रीराम पार्कींग येथील मोफत दर्शनपास वितरण काऊंटरवर उपलब्ध असल्यास दुस-या दिवसाचे मोफत दर्शनपास सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या वेळेत वितरीत करणेत येतील.
. तथापि, वरील सुट्टयांचे दिवशी बुकींग झालेले दर्शनपास याचा विचार करुन, दर्शनाचे मोफत दर्शनपास उपलब्ध असतील तरच संस्थानचे सर्व भक्तनिवासस्थान येथील मोफत दर्शनपास काऊंटरवर पहाटे ०५.०० ते रात्रौ १०.०० या वेळेतच वितरीत करणेत येतील.
महत्वाची सुचना –
सर्व साईभक्तांना आवाहन करण्यात येते की, संस्थान प्रशासन आपले सोईसाठी सुलभ दर्शनव्यवस्था करण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे. सर्वांनी सुचनांचे पालन करुन सहकार्य करणे अपेक्षीत आहे. कोव्हीड – १९ चे पार्श्वभूमीवर दर्शनरांगेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास परिस्थिती विचारात घेऊन नाईलाजास्तव दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याची गरज भासू शकते.
टिप –
कान्हूराज बगाटे (भा.प्र.से.)
१. १० वर्षाच्या आतील मुले व ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी कोव्हीड – १९ चे पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येण्याचे टाळावे.
२. कोव्हीड-१९ चे पार्श्वभूमीवर निवासव्यवस्था मर्यादित असल्यामुळे संस्थानचे निवासस्थानांमध्ये रुम घेऊ इच्छिणा-या भक्तांनी online.sai.org.in या वेबसाईटव्दारे रुमचे आगाऊ बुकींग करुनच निवासव्यवस्थेचा लाभ घ्यावा.
३.दर्शनपासचे उपलब्धतेबाबत प्रकटन दररोज तारीखनिहाय वेळोवेळी मंदिराचे सर्व प्रवेशव्दारांवर, सर्व भक्तनिवास, वेबसाईट, वृत्तपत्रे व वृत्तवाहीन्यांवर प्रकाशित करणे येईल.
सर्व भक्तगणांनी याची नोंद घ्यावी व संस्थान प्रशासनास सहकार्य करावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी