शिर्डी | प्रतिनीधी संजय महाजन…
शिर्डी उर्दू हायस्कुलचे शिक्षक मो.अजमत इकबाल यांना गुगल या जागतिक कंपनीने त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवून त्यांना जागतिक स्तरावर ओळख दिली. त्यानिमित्त शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने मो. अजमत इकबाल यांचा सन्मानपत्र देऊन भव्य गौरव करण्यात आला.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळ्या शाळा व महाविद्यालये बंद होती. या काळात अजमत इकबाल यांनी विद्यार्थ्यांना गुगल मीट द्वारे शिक्षण देऊन तसेच सर्वांना या शिक्षणाचा लाभ व्हावा या हेतूने ही व्हिडीओ युट्यूब वर अपलोड करून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. या कार्याची दखल घेत गुगलने त्यांची महाराष्ट्रातून एकमेव उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करून त्यांनी लोकडाऊन मध्ये ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमांतर्गत केलेल्या आगळ्यावेगळ्या कार्याचे गौरव केले तसेच त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवली. त्यानिमित्त त्यांचे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच त्यांचे राज्यभरातून सर्वस्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
मो. अजमत इकबाल यांचे कार्य प्रचंड दिशादर्शक व प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या कार्याने शिर्डीचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर पोहचले आहे. त्यांच्या मेहनतीचे तसेच त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत असलेल्या तळमळीचे कौतुक करावे तितके थोडे अश्या भावना संस्थेचे जावेदभाई शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे मुख्याध्यापक रज्जाक पटेल सर तसेच सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचेदेखील त्यांनी विशेष अभिनंदन केले.
यावेळी शिर्डी उर्दू हायस्कुलचे मुख्याध्यापक रज्जाक पटेल सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाने ईद मिलाद निमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पुढच्या वर्षी सर्व परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र व भेट देण्याची तसेच संस्थेच्या वतीने विद्यालयाच्या अकरा हजार रुपये देणगी म्हणून देण्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमुदभाई सैय्यद यांनी केली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी संस्थेचे अभिनंदन केले आणि आभार मानले.
याप्रसंगी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे सरदार पठाण, हाजी शमशुद्दीन,युनूस शेख, संस्थेचे दादाभाई इनामदार, आखलाख खान,अश्रफ सैय्यद, मुख्तार सैय्यद, साजिद सेख, अन्सार शेख, समीर अमीर शेख, शायद सय्यद,अय्युब शाह,आदिल पठान, आसिफ इनामदार,दुआ फाउंडेशनचे अल्ताफ पठाण, इम्रान शेख तनवीरभाई,तनवीर शाह, आदी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.